Thursday, September 11, 2014

रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली.

प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू -
आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे.  अगदी शरीरात विनाकारण साठणारी चरबी देखील याच विजातीय द्रव्यांमध्ये येते. शरीरामध्ये नेहमी ही विजातीय द्रव्ये शोधून बाहेर टाकण्याचे काम चालू असते.
मोडर्न मेडिसिनच्या दृष्टीने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे रोगजंतूंसोबत लढण्यची शरीराची शक्ती. एक प्रकारे ते बरोबरच आहे. कारण ते देखील एक विजातीय द्रव्यच आहे, आणि शरीर देखील त्याच्याबरोबर लढाच करत असते. आणि त्यामध्ये शरीरातील अनेक यंत्रणा कार्यरत असतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की रोग होतो एव्हढेच मोडर्न मेडिसीन म्हणते.

आरोग्याच्या समांतर शाखांचा दृष्टीकोन मात्र थोडा वेगळा आहे. होमिओपॅथी मध्ये रोगग्रहणक्षमता (susceptibility - संवेदनशीलता) अशी एक संज्ञा आहे. माझ्यादृष्टीने त्याची व्याख्या म्हणजे रोग वेळेवर ओळखण्यची क्षमता. आपण लहानपणी शिकलो त्याप्रमाणे आजारांचे २ प्रकार असतात. (मॉडर्न मेडिसीनप्रमाणे)
१. रोग - जो रोगजंतूंमुळे होतो - उदा. न्युमोनिया, टायफॉईड, इ.
२. विकार - जे शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे होतात.

समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. त्यामुळे उपाय पण त्यावरच केला जातो.

कमिंग बॅक टू रोगग्रहणशक्ती - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे शरीराची विजातीय द्रव्ये योग्यवेळी शोधून बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते, याचाच परिणाम शरीरात रोग निर्माण होण्यात होतो.
आयुर्वेद म्हणतो अयोग्य आहार-विहारांमुळे शरीरात दोष वाढीस लागतात. हे वाढलेले दोष बाहेर टाकण्यासाऱही स्थिती जर शरीराकडे नसेल - म्हणजे
१. अशक्तपणा - पोटात अपचन झालेले अन्न आहे, पण जुलाब करून ते बाहेर टाकण्याची शक्ती शरीराकडे नाही.
२. आत्यंतिक प्रमाणात बिघडलेले राहणीमान - यांमध्ये पहिले दोष बाहेर काढण्यापूर्वीच नवीन पुन्हा शरीरात तयार होतात - जसे की रोज जागरण करणे - जागरणामुळे शरीरात पित्त निर्माण होते. म्हणजेच विजातीय द्रव्ये. ही द्रव्ये शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा जागरण झाले तर मग शरीरात पुन्हा पित्त निर्माण होईल. मग हे पित्त त्याच जुन्या साठ्यात साठवले जाईल.
किंवा ईतरही काही कारणे असतील.

आता गम्मत अशी आहे की केव्हा ना केव्हा तरी शरीराची म्हणजे त्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता संपणारच. मग अश्यावेळेस शरीरासमोर २ पर्याय शिल्लक राहतात -
१- तीव्र शाररीक क्रिया - जसे की उलटी द्वारे हे पित्त बाहेर फेकून देणे
२. - जर पर्याय १ काही कारणाने शक्य नसेल, काही कारणाने उदा. एखादा माणूस माझ्यासारखा उलटी होऊच देत नाही, तेव्हा मग ते शरीरातच कुठेतरी स्थानबद्ध करणे. (पुन्हा एकदा सांगतो - मी आयुर्वेदाच्या दॄष्टीकोनातून पित्त म्हणतोय. त्यामागे कोणती केमिकल असतात ते मला माहीत नाहीत, पण कोणतीतरी असतात हे नक्की)

शरीर हा दोष स्थानबद्ध करायला निघाले आहे, याचाच अर्थ माझी या दोषाबद्दलची संवेदशीलता आता कमी होत चालली आहे. आता हे साठवायचे कुठे असा प्रश्न आहे - त्याचे उत्तर शरीराच्या बाबतीत सोपे आहे. असा दोष साठवण्याचे २ निकष आहेत
१. शरीराच्या त्या भागाची तो दोष साठवण्याची क्षमता असली पाहिजे.
२. शरीराच्या त्या अवयवाकडे त्या दोषाबद्दल कमी संवेदनशीलता असली पाहिजे - म्हणजे शरीराने पुन्हा सांगेपर्यंत त्या अवयवाने तो दोष बाहेर टाकण्याचा प्रयत्न करता नये.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोटावर साठवली जाणारी चरबी.

परंतु इथेच तर सारी मेख आहे - कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाची असा दोष साठवण्याची क्षमता अमर्यादित नसते, केव्हातरी त्या स्थानावरचा घडा भरतोच, आणि मग शरीराचा तो अवयव असहकार पुकारतो. उदा. डोकेदुखी - डोके किंवा त्याचे नियंत्रण करणारे स्थान, जिथे हे पित्त साठलेले आहे, ते शरीराला सांगते की माझी क्षमता संपली. एकतर हे पित्त बाहेर टाका, किंवा दुसरीकडे हलवा. शरीर त्याप्रमाणे काहीतरी कृती करते आणि मग डोकेदुखी थांबते.
म्हणूनच आयुर्वेदाकडे २ प्रकारच्या चिकित्सा आहेत.
१ शमन - यामध्ये हा तात्कालिक प्रकारचा दोष शांत केला जातो. काही प्रकारची औषधे घेऊन, जसे की पित्ताची मात्रा, हा दोष तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून शांत केला जातो. 
२. उत्सर्जनः- यामध्ये असा दोष शरीरातून त्याच्या मूळ स्थानी आणून मग उस्तर्जन केला जातो. उदा - पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
मूलतः या उत्सर्जन चिकित्सेमध्ये औषधोपचारांनी विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. सामान्यपणे अशी अपेक्षा असते की अश्या प्रकारे शरीरेशुद्धी झाल्यावर शरीराची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होईल आणि त्यामुळे शरीराचे काम सुरळीत चालू लागेल. तसे झाले नाही तर बहुधा पुन्हा पंचकर्म चिकित्सा करतात.

या सर्व विवेचनामध्ये एक गोष्ट अजून आलेली नाही, ती म्हणजे रोगग्रहणशक्ती - रोगग्रहणशक्तीची माझ्यापुरती व्यख्या अशी, की विजातीय द्रव्य तत्काळ  बाहेर टाकण्याच्या शरीरात असलेल्या यंत्रणेत झालेला बिघाड.
आता आपण रोगजंतुजन्य रोगांकडे येउ -
प्रत्येक रोगजंतुचे आपले असे स्थान असते, तो रोगजंतु फक्त त्याच अवयवाला संसर्ग करू शकतो. मग होते असे, की जर एखादा दोष जर त्या स्थानात अगोदरच ठाण मांडून बसला असेल, तर त्या रोगजंतुला आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते. जसे की घश्याला होणारा संसर्ग - वातपित्तकर खाण्यामुळे जर घसा दूषित झाला असेल, तर त्याला व्हायरल इन्फेक्शनसाठी आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते.

म्हणजे असे बघा, पोटात बाहेरून खाण्यापोटातकोणता तरी जीवाणू आला, जर शरीराची संवेदनशीलता चांगली असेल, तर शरीराला जो जीवाणू लगेच कळेल, आणि तत्काळ शरीर कृती करून तो जीवाणू बाहेर फेकेल. पण तसे जर झाले नाही, शरीराची तेव्हाची संवेदनशीलता जर कमी असेल, तर मग तो जीवाणू शरीरात कुठेतरी स्थानबद्ध केला जाईल. स्थानबद्ध केलेला जीवाणू कालांतराने आपली संख्या वाढवून पुन्हा शरीराला अपायकारक होतोच, आणि त्यावेळी तो जास्त संख्येने असल्यामुळे त्याचा प्रतिकार करणे देखील कठीण जाते. आणि मग अश्या वेळेस शमन चिकित्सा करून तो बरा करावा लागतो.
जसे की - उदाहरण आपण टायफोईड चे घेउ - टायफोईड हा आतड्यांमध्ये वाढणारा जीवाणू आहे. त्याला वाढीसाठी जडान्न, किंवा पोटात दीर्घकाळ साठून राहिलेले अन्न उपयोगी पडते. जेव्हा टायफोईड्चा जंतू शरीरात प्रवेश करतो तेव्हा हर आपण आपण मिताहारी, आणि हलका, सुपाच्य आहार घेत असू, आणि आपली संवेदनशीलता जागृत असेल, तर त्यावर वेळीच उपाय होईल, आणि त्या जंतूंना वाढीस संधी मिळणार नाही.
परंतु तसे जर झाले नाही तर,
जर त्या जंतूंना बाहेर टाकले गेले नाही, तर मग ते त्यांच्या स्थानात, म्हणजे आतड्यात स्थानबद्ध होतात. पोटात त्या जंतूंना वाढीस अनुकूल स्थिती मिळाली, तर मात्र ते जोमाने वाढीस लागतात. अश्या वेळेस शरीरची स्थिती देखील त्या जंतूंना बाहेर टाकण्याला अनुकूल नसते, त्यामुळे शमन चिकित्सा करावी लागते. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे टायफॉईड चा उलटणारा ताप. ताप बरा होता होता जर काही कुपथ्य झाले, तर मग टायफॉईड चा दुप्पट जोमाने उलटतो, आणि मग त्याला आवर घालणे कठीण होते. )
आता आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी होते ते पाहू, शरीरातून रोग बाहेर टाकणे शक्य नाही, म्हणजे मग तो शरीरातच संपवला पाहिजे. तो कसा संपवणार? आयुर्वेद म्हणतो, की रोग संपवायचा असेल, तर त्याचे शरीरातील स्थान नष्ट करा, म्हणजे आतडी काढून टाकायची की काय? :) तर तसे नव्हे. शरीरात जे त्रिदोषांच्या असमानतेमुळे रोगाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे ते पुन्हा समस्थितीत आणून त्या रोगाचे स्थान उद्वस्त करणे. उदा. टायफॉईडच बघू, त्याचे स्थान आहे आतड्यातले न पचलेले अन्न - या परिस्थितीत खालील उपाय संभवतात -
१. लंघन - शरीराला कमीत कमी - अगदी गरजेपुरतेच अन्न द्यायचे, ते देखील अतिशय हलके, सुपाच्य. त्यालाच पथ्य म्हणतात. प्रत्येक आजाराप्रमाणे त्याचे पथ्य बदलू शकते.
२. पाचन - शरीरातील न पचलेले अन्न पचन करून ते बाहेर टाकणे,आणि रोगात निर्माण विजातीय द्रव्यांचे शमन करणे यासाठी वेगवेगळी औषधे, काढे वगैरे दिले जातात.
या दोन उपायांनी शरीरातील रोगाचे स्थानच उध्वस्त झाल्यावर रोग तिथे फार काळ राहू शकत नाही.

आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे -
ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं |
ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं |
बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे.

तर ही झाली संवेदनशीलता, रोगग्रहणशक्ती, आणि,आयुर्वेदाची पद्धती/ तत्वज्ञान..
पुढील भागात होमिऑपॅथी, आणि योगोपचारांकडे आणि इतर बाजूंकडे एक नजर टाकू.
===============================================================================
डिस्क्लेमर - मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही, पण घरात तसे वातावरण असल्यामुळे थोडाफार अभ्यास आहे, त्यामुळे यात त्रुटी नक्कीच राहू शकतात. जाणकारांनी त्या दूर कराव्यात, अशी त्यांना विनंती.
===============================================================================
मी मॉडर्न सायन्सेसचा प्रतिवाद करण्याऐवजी समांतर चिकित्सापद्धती मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे, या चिकित्सापद्धतींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत आहे.
चु. भु. दे. घे.

(क्रमशः)

पौराणिक विमाने


 

सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या.
"पेरु" (खायचा नव्हे Smile ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी...
http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1...
अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे.
प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे...
https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru
म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय?
http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm
ही म्हणे धावपट्टी असावी
http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm
आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!

कर्मविपाक - एक प्रयत्न

पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे माणसाला पहिल्यापसून भुरळ पाडणारे विषय आहेत. असंख्य लोकांनी त्यावर बरेच काही लिहून ठेवले आहे, त्यावर मी अणखीन लिहिणे म्हणजे..
उपनिषदांत एका शब्दात सांगितले आहे - तत्त्वमसि|
ते समजायला कठीण जाऊ लागले म्हणून श्रीक्रुष्णांनी गीता संगितली.
तेही कठीण जाऊ लागले म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली.
आता तेही कठीण जाऊ लागले म्हणून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात Smile
असो. कर्मविपाक म्हणजे मला असे वाटते की - समता राखण्याच्या दृष्टीने प्रकृतीने केलेले नियम.. आपण निसर्गात पाहिले तर हे सर्वत्र पहायला मिळते. जेव्हा एक पर्वत उभा राहतो तेव्हा एक खड्डा पण पडतो. दुष्काळ पडतो तेव्हा अतिवृष्टी देखील कुठेतरी होतच असते. देवाण-घेवाण देखील जीवनाच्या सर्व स्तरांमध्ये चालूच असते. आपण काही उदाहरणे पाहू.
जीवो जीवस्य जीवनम् .. पक्षी किडे खातात, मोठे पक्षी लहान पक्ष्यांना खातात, आणि ही सा़खळी अखंड चालूच असते. याचाच वेगळ्या शब्दांत सांगयाचे झाले तर - "तुम्ही जे देता, तेच तुम्हाला मिळते", किंवा "पेराल तेच उगवेल" यातून देखील थोड्या फार फरकाने हेच सांगितले आहे.
सर्वात प्रथम हे विश्व निर्माण झाले तेव्हा सम स्थितीतच होते. आणि मला हे अशक्य वाटत नाही. सर्व जग जर एकाच मूलतत्वांपासून बनले आहे तर मग ते जन्म झाल तेव्हा सम असण्याची शक्यता आहेच.त्यामध्ये गती कशी आली हा एक प्रश्न आहे खरा, आणि विज्ञानाने ते कळेल का, आणि कधी कळेल तेही माहीत नाही.
असे म्हणतात पूर्वी कर्मविपाक नव्हता, कारण सर्वांनाच आपल्या स्वरूपाची जाणीव होती.मला असे वाटते की याचाच अर्थ असा होतो की सर्वजण आपल्या नैसर्गिक(ईश्वरी) प्रेरणेप्रमाणे वागत होते. आपण एक उदाहरण घेऊ.
आपल्या शरीरात कोट्यावधी पेशी असतात. आता त्या पेशींना त्यांचे अस्तित्व नाही का? तर आहे. त्या पेशींना हे माहीत नसते की आपण एका मोठ्या शरीराचा भाग आहोत. त्या बिचार्‍या आपल्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे वागत असतात. परिणाम म्हणून शरीर चालत असते. मला असे वाटते की आपण देखील अशीच एक पेशी आहोत. एका विराट पुरुषाची. हजारो पेशी प्रतिक्षणी मरत असतात, तेव्हढ्याच परत जन्म घेत असतात. आपलेही असेच नाही का?
परंतु हे मग एव्हढ्यावर थांबत नाही. हा न्याय लावयचा झाला तर मग जे पिण्डी ते ब्रह्माण्डी आणि जे ब्रह्माण्डी ते पिण्डी नाही का? एक छोटासा डी एन ए जर संपूर्ण माणसाची कुंडली ठरवत असेल तर मग ही जाणीव अणखीनच वाढते.
मध्यंतरी निरंजन घाटे यांचे एक पुस्तक (बहुधा असंभव) वाचले होते. त्यात त्यांनी पुनर्जन्म, समाधी म्रुत्युसमीपतेचे अनुभव यांवर चालू असलेल्या संशोधनाचा परामर्ष घेतला आहे. त्यातले काही अनुभव मेंदूमधील रासायनिक क्रियांमुळे होतात असे सिद्ध झाले आहे, पण काही अजून गूढच आहेत. (खरतर मि इथे अशी विनंती करेन की कोणितरी त्या पुस्तकावर परीक्षण लिहावे.)
-------
मूळ मुद्दा कर्मविपाक जरा बाजूला गेला. कर्मविपाकाचे असे म्हणणे आहे, की तुमचे अस्तित्वच मुळी काहीतरी कर्म असलयामुळे आहे. कर्मविपाकाचे असेदेखील म्हणणे आहे की कर्म केल्याखेरीज जगणे अशक्य आहे. एका गोष्टीला स्पर्ष मला करावा लागेल- कर्मविपाकावर घेतला जाणारा पहिला अक्षेप सर्वात पहिले कर्म कसे निर्माण झाले? एक उदाहरण घेऊया. रशियामध्ये सारेजण समान आहेत म्हणून क्रांती झाली, म्हणजे सारे़जण समान झाले.म्हणजेच सुरुवात झाली - शून्यापासून. नंतर असमानता आलीच की.
तर कर्मविपाक अस म्हणतो की तुम्ही जे कर्म कराल, त्यामुळे विश्वात जी असमानता निर्माण होईल ती समान केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. आता हा हिशोब कसा सम्पवायचा याबद्दल मि इथे लिहत नाही.. त्यावर तज्ञांचीच मते घ्यावीत. परंतु कर्मविपाक असेही म्हणतो की तुम्ही कर्मात लिप्त नसाल तर ही कर्मे तुम्हाला बाधत नाहीत. आता याचा अर्थ काय? मला असे वाटते की जर तुम्हाला जाणीव असेल की जे काही कर्म माझ्या हातून घडत आहे ते मी माझ्या भावनेसाठी करत नाहीये, तर हे त्या विराट पुरूषाच्या श्वासाचा भाग आहे, तर मग तुम्हाला ते कर्म बाधू शकत नाही.

Wednesday, September 10, 2014

तुमचे शरीर अपचन कसे हाताळते?

मला दोन प्रश्न आहेत,
तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?
१. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते
२. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात.
३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते.
४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते..
औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे.
आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न -
तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते. तेव्हा तुम्ही काय करता?
१. मी ज्याचे माप केव्हातरी त्याच्या पदरात घालतोच. सडेतोड.
२. विचार करतो, जमल तर मन्य करतो, नाहीतर सोडून देतो.
३. कोणाशीच बोलता येत नाही, भयंकर मनस्ताप होतो, आतल्या आत धुमसत रहतो.
४. तिथे नाही जमले तर कोणाजवळ तरी मन मोकळे करतोच.
या प्रश्नांना या व्यतिरिक्त आणखीदे़हील पर्याय असू शकतात, पण मला सुचले ते इथे दिले आहेत. आपण आणखीन पर्याय देखील वाढवू शकता.
काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे.
ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय